प्यू रिसर्च सेंटरच्या नवीन सर्वेक्षणानुसार वसाहतवादी राजवटीपासून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ 70 पेक्षा जास्त वर्षांनी, भारतीयांची सर्वसाधारण भावना अशी आहे की, त्यांच्या देशाने आपल्या स्वातंत्र्योत्तर आदर्शांचे पालन केले आहे: या समाजात वेगवेगळ्या धर्मांचे लोक राहू शकतात आणि स्वेच्छेने आपल्या धर्माचे आचरण करू शकतात.

भारताची अतिप्रचंड लोकसंख्या वैविध्यपूर्ण तसेच धर्मपरायण आहे. जगातील बहुसंख्य हिंदू, जैन आणि शीखधर्मीय भारतात राहतात. एव्हढेच नाही तर जगातील मुस्लिमधर्मीयांपैकी भारतात राहणाऱ्या मुस्लिमधर्मीयांची संख्या देखील लक्षणीय आहे तसेच ख्रिश्चन आणि बौद्धधर्मीयांची संख्या देखील लाखोंच्या घरात आहे.

वर्ष 2019 ची अखेर ते 2020 ची सुरुवात या दरम्यान (कोविड-19 महामारीच्या अगोदर), 17 भाषा आणि सुमारे 30000 प्रौढ व्यक्तींच्या प्रत्यक्ष समोरासमोर घेतलेल्या मुलाखतींवर आधारित संपूर्ण भारतात घेतल्या गेलेल्या एका प्रमुख आणि नवीन धर्मविषयक सर्वेक्षणात असे आढळून आले की, या प्रकारची धार्मिक पार्श्वभूमी असलेले भारतीय, त्यांना त्यांच्या श्रद्धांचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे ठामपणे सांगतात.

भारतीय लोकांच्या विचारसरणीनुसार, धार्मिक सहिष्णुता हा त्यांच्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा मध्यवर्ती गाभा आहे. सर्वच प्रमुख धार्मिक गटांमध्ये, बहुतेक लोक असे म्हणतात की “खरेखुरे भारतीय” असण्यासाठी सर्व धर्मांचा आदर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच सहिष्णुता हे एक धार्मिक तसेच नागरी मूल्य आहे: भारतीय लोक, इतर धर्मांचा आदर करणे हा त्यांच्या स्वतःच्या धर्म समुदायाचा सदस्य असण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असे एकमुखाने सांगतात.

या सामाईक मूल्यांसोबत, धार्मिक अंतर ओलांडून जाणाऱ्या अनेक समजुती प्रचलित आहेत. भारतात फक्त बहुतांश हिंदूच (77%) कर्मावर विश्वास ठेवतात असे नाही, तर मुस्लिम धर्मीय देखील जवळपास त्याच टक्केवारीच्या प्रमाणात कर्मावर विश्वास ठेवतात. भारतातील 81% हिंदूंबरोबर, एक तृतियांश (32%) ख्रिश्चन, हिंदू धर्मातील मध्यवर्ती श्रद्धा असलेल्या, गंगेच्या पाण्यात सर्वांना पवित्र करण्याची शक्ती आहे या संकल्पनेवर, विश्वास ठेवतात. उत्तर भारतात, 12% हिंदू, 10% शीख आणि त्याचबरोबर 37% मुस्लिम, इस्लामशी अतिशय जवळचा संबंध असलेल्या सूफीवाद या एका गूढ परंपरेबरोबर स्वतःला जोडतात. आणि सर्व प्रमुख धार्मिक पार्श्वभूमीचे, प्रचंड बहुसंख्येतील भारतीय म्हणतात की, आपल्याहून वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा मान राखणे ही गोष्ट त्यांच्या श्रद्धेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

तरीही, काही विशिष्ट मूल्ये आणि धार्मिक निष्ठा समान असताना –तसेच एकाच देशामध्ये, एकाच संविधानाखाली राहत असताना – भारताच्या प्रमुख धार्मिक समाजांच्या सदस्यांना पुष्कळदा त्यांच्यात खूप काही साम्य आहे असे वाटत नाही. बहुतांश हिंदू स्वतःला मुस्लिमांपेक्षा अत्यंत भिन्न समजतात (66%), आणिबहुतेक मुस्लिमांची देखील ते हिंदूंपेक्षा अत्यंत भिन्न असल्याची तीच भावना आहे (64%). याला काही अपवाद आहेत: दोन-तृतीयांश जैन आणि सुमारेअर्धेअधिक शीख म्हणतात की त्यांच्यामध्ये आणि हिंदूंमध्ये बरेच साम्य आहे. परंतु सर्वसाधारणपणे, भारतातील प्रमुख धार्मिक समाजाच्या लोकांमध्ये स्वतःला इतरांपासून फार भिन्न समजण्याची वृत्ती आहे.

भिन्नतेचा हा दृष्टीकोन भारताच्या धार्मिक गटांमध्ये वेगळेपणा राखणाऱ्या परंपरा आणि प्रथांमध्ये प्रतिबिंबित झालेला दिसतो. धार्मिक गटांच्या विविध श्रेणीतील अनेक भारतीय म्हणतात की, लोकांना त्यांच्या धर्मसमुदायाहून वेगळ्या धर्मातील व्यक्तीबरोबर विवाह करण्यापासून रोखणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ढोबळमानाने भारतातील दोन-तृतीयांश हिंदूंना, हिंदू स्त्रियांच्या (67%) किंवा हिंदू पुरूषांच्या (65%) आंतरधर्मीय विवाहाला प्रतिबंध करण्याची इच्छा असते. मुस्लिमांमध्ये याहीपेक्षा जास्त लोकांना तसेच वाटते: त्यांच्यातील 80% लोक म्हणतात की मुस्लिम स्त्रियांना आंतरधर्मीय विवाह करण्यापासून रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि 76% लोक म्हणतात की मुस्लिम पुरूषांना असे करण्यापासून रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

भारतीय त्यांच्या स्वतःच्या धार्मिक समुदायांमध्ये मैत्री देखील अत्यंत उत्कटतेने करतात – ही प्रवृत्ती केवळ हिंदू आणि मुस्लिमांमध्येच नाही, तर शीख आणि जैन यांसारख्या छोट्या धार्मिक गटांमध्ये देखील आढळते. प्रचंड बहुसंख्येने भारतीय (एकूण 86% भारतीय, 86% हिंदू, 88% मुस्लिम, 80% शीख आणि 72% जैन) म्हणतात की त्यांचे जवळचे मित्र किंवा मैत्रिणी मुख्यत्वे किंवा संपूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या धार्मिक समुदायातील व्यक्ती आहेत. एकाहून अधिक प्रकारे, भारतीय समाज म्हणजे, ज्यांमध्ये धार्मिक समुदायांमधील भिन्नतेच्या स्पष्ट रेषा आहेत अशा “ठिगळ जोडलेल्या कापडा” सारखा आहे.

फार थोड्या भारतीयांनी असे म्हंटले आहे की त्यांच्या शेजारीपाजारी फक्त त्यांच्या स्वतःच्या धार्मिक समुदायाचे लोक राहत असावेत. तरीही, अनेक लोक त्यांच्यानिवासी भागापासून किंवा गावांमधून काही विशिष्ट धर्माच्या लोकांना दूर ठेवणे पसंत करतील. उदाहरणार्थ, अनेक हिंदूंची (45%) त्यांच्या शेजारी इतर सर्व धर्माचे लोक असण्याला काही हरकत नाही – ते मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध किंवा जैन असले तरी –परंतु तितक्याच समप्रमाणात (45%) लोक म्हणतात की ते यापैकी कमीतकमी एका गटाच्या अनुयायांचा स्वीकार करण्यास इच्छुक नसतील, ज्यामध्ये शेजारी म्हणून कोणी मुस्लीम नको असणाऱ्या तीनपैकी एकापेक्षा जास्त हिंदूंचा (36%) समावेश आहे. जैनांमध्ये, बहुतांश (61%) म्हणतात की ते या गटांपैकी कमीतकमी एका गटाला शेजारी म्हणून स्वीकारू इच्छित नाहीत, ज्यात मुस्लिम शेजारी न स्वीकारणारे 54% लोक समाविष्ट आहेत.

अतिरिक्त मुख्य निष्कर्षांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:

 • सर्वेक्षणामध्ये आढळून आले की हिंदूंमध्ये त्यांची धार्मिक ओळख आणि भारतीय राष्ट्रीय ओळख घट्टपणे गुंफलेली अशी पाहण्याची वृत्ती असते: असलेल्या हिंदूपैकी जवळपास दोन-तृतीयांश (64%) लोक म्हणतात की “खरेखुरे” भारतीय असण्यासाठी हिंदू असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • बहुतेक हिंदू (59%) भारतीय ओळख ही संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या डझनावारी भाषांपैकी एक – हिंदी भाषा बोलता येण्याशी देखील जोडतात. आणि राष्ट्रीय ओळख असण्याचे हे दोन मापदंड – हिंदी बोलता येणे आणि हिंदू असणे – हे जवळून जोडलेले आहेत. हिंदूंपैकी जे लोक असे म्हणतात की खरेखुरे भारतीय असण्यासाठी हिंदू असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामधील 80% लोक असे देखील म्हणतात की खरेखुरे भारतीय असण्यासाठी हिंदी बोलणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • दुसरीकडे, विविधता ही आपल्या देशासाठी लोढणे असण्यापेक्षा हितकारी आहे असे मानणाऱ्या भारतीयांची संख्या अधिक आहे : ढोबळमानाने अर्धे (53%) प्रौढ भारतीय असे म्हणतात की भारताच्या वैविध्यपूर्ण धार्मिकतेचा देशाला फायदा होतो, तर सुमारे एक चतुर्थांश (24%) विविधतेला हानीकारक समजतात, आणि या दोहोंत हिंदू आणि मुस्लिमांची आकडेवारी समान आहे.
 • भारतीय मुस्लीम जवळजवळ एकमताने (95%) म्हणतात की भारतीय असण्याचा त्यांना अतिशय अभिमान आहे, आणि त्यांना भारतीय संस्कृतीविषयी कमालीची आस्था आहे : सर्वेक्षणातील 85% लोक “भारतीय लोक परिपूर्ण नाहीत, परंतु भारतीय संस्कृती इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे” या विधानाशी सहमत आहेत.
 • सुमारे एक चतुर्थांश मुस्लिम म्हणतात की त्यांच्या समाजाला भारतामध्ये “पुष्कळ” भेदभावांना सामोरे जावे लागते (24%). ज्या प्रमाणात मुस्लिम आपल्या समाजाविरूद्ध मोठ्या प्रमाणावर पसरलेला भेदभाव पाहातात त्याचे प्रमाण हिंदूंच्या प्रमाणा इतकेच आहे. हिंदू धर्मियांच्या म्हणण्यानुसार हिंदूं धर्मियांना भारतामध्ये मोठया प्रमाणावर पसरलेल्या भेदभावाचा सामना करावा लागतो (21%).
 • शीख लोकांना त्यांची भारतीय म्हणून ओळख असण्याचा अत्यंत अभिमान वाटतो. जवळजवळ सगळे शीख (95%) आपण भारतीय असण्याबद्दल अत्यंत अभिमानी आहोत असे म्हणतात आणि जी व्यक्ती भारताचा अनादर करते, ती शीख असूच शकणार नाही अशी बहुसंख्य शिखांची (70%) भावना आहे. आणि भारताच्या इतर धार्मिक गटांप्रमाणे, बहुतेक शीख लोकांना त्यांच्या समाजाविरूद्ध मोठ्या प्रमाणावर भेदभाव पसरल्याचा पुरावा दिसत नाही – फक्त 14% म्हणतात की शीख लोकांना भारतामध्ये पुष्कळ भेदभाव सहन करावा लागतो.
 • इतर धार्मिक समाजांपेक्षा ‘सामुदायिक हिंसा ही देशातील फार मोठी समस्या आहे’ असे शीख लोकांनी मानण्याची शक्यता खूप जास्त आहे. 65% हिंदू आणि मुस्लिमांच्या तुलनेत जवळजवळ दहापैकी आठ शीख (78%) सामुदायिक हिंसेचे एक प्रमुख समस्या म्हणून मूल्यमापन करतात.
 • सर्वेक्षणात आढळून आले की बहुतेक भारतीयांना मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जातीवर आधारित भेदभावाची जाणीव नाही. पाचपैकी फक्त एक भारतीय व्यक्ती म्हणते की अनुसूचित जातींच्या सदस्यांविरूद्ध पुष्कळ भेदभाव केला जातो, तर 19% लोक म्हणतात की अनुसूचित जमातींविरूद्ध खूप भेदभाव केला जातो आणि काही थोडे लोक (16%) इतर मागासवर्गीय जातींविरूद्ध उच्च पातळीवर भेदभाव होतो असे मानतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या सदस्यांना त्यांच्या दोन गटांविरूद्ध मोठया प्रमाणात पसरलेल्या भेदभावाविषयी इतरांपेक्षा थोडी जास्त जाणीव असण्याची शक्यता आहे.
 • इतर जातींमधील बहुतेक भारतीय (72%) म्हणतात की त्यांना अनुसूचित जातीचा सदस्य शेजारी म्हणून असलेला चालेल. परंतु जवळजवळ तितक्याच प्रचंड बहुसंख्येने एकूण भारतीय (70%) म्हणतात की त्यांचे बहुतेक किंवा सर्व जवळचे मित्र त्यांच्याच जातीचे आहेत.
 • एकूण मिळून 64% भारतीय म्हणतात की त्यांच्या समाजातील स्त्रियांना आंतरजातीय विवाह करण्यापासून रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि सुमारे तितक्याच प्रमाणात (62%) लोक म्हणतात की त्यांच्या समाजातील पुरूषांना आंतरजातीय विवाह करण्यापासून रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • सर्व प्रमुख धर्मांतील, प्रचंड बहु संख्येने भारतीय म्हणतात की धर्म त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच प्रत्येक प्रमुख धर्माचे कमीतकमी तीन-चतुर्थांश अनुयायी म्हणतात की त्यांना त्यांचा स्वतःचा धर्म आणि त्यातील प्रथांविषयी चांगली माहिती आहे. भारतीय मुस्लिम हे हिंदूंपेक्षा त्यांच्या जीवनामध्ये धर्माला जास्त महत्त्वपूर्ण मानत असण्याची शक्यता थोडी जास्त आहे (91% वि. 84%). तसेच हिंदूंपेक्षा, मुस्लिम लोक त्यांना त्यांच्या धर्माविषयी चांगली माहिती आहे हे म्हणण्याची शक्यता देखील थोडी जास्त आहे (84% वि. 75%).
 • प्रत्येक धार्मिक गटातील लोक लक्षणीय प्रमाणात दररोज प्रार्थना देखील करतात. – जरी ख्रिश्चनांनी धर्म त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असे म्हणण्याची शक्यता इतर धर्मीयांच्या तुलनेत सर्वात कमी (76%) असली तरी या सहा गटात दररोज प्रार्थना करण्याचे ख्रिश्चनांचे प्रमाण बहुधा सर्वात जास्त (77%) आहे. बहुतांश हिंदू आणि जैन देखील (अनुक्रमे 59% आणि 73%) दररोज प्रार्थना करतात आणि ते दररोज घरामध्ये किंवा मंदिरामध्ये पूजा करतात (57% आणि 81%) असे म्हणतात.
 • जवळजवळ सर्व भारतीय (97%) म्हणतात की त्यांचा ईश्वरावर विश्वास आहे, आणि बहुतांश धार्मिक गटांमधील साधारणपणे 80% लोक म्हणतात की ईश्वर अस्तित्वात आहे या गोष्टीची त्यांना पूर्णपणे खात्री आहे. याला मुख्य अपवाद बौद्धांचा आहे. त्यांच्यापैकी एक-तृतीयांश लोक त्यांचा ईश्वरावर विश्वास नाही असे म्हणतात. तरीही, बौद्धांपैकी ज्या व्यक्ती ईश्वर अस्तित्वात आहे असे मानतात, त्यातील बहुतांश लोकांना याबद्दल पूर्ण खात्री आहे.
 • जरी ईश्वरावर विश्वास हा भारतामध्ये जवळजवळ सगळीकडे प्रचलित असला, तरी सर्वेक्षणामध्ये भारतीय लोक ज्यावर विश्वास ठेवतात अशा देव किंवा देवतांच्या प्रकारांविषयी अनेकविध विचार असल्याचे आढळून आले. प्रचलित विचार असा आहे की ईश्वर एक आहे आणि त्याची “अनेक रूपे आहेत” (54%). परंतु सुमारे एक-तृतीयांश लोक स्पष्टपणे म्हणतात की : “ईश्वर फक्त एकच आहे” (35%). फारच थोडे लोक म्हणतात की ईश्वर अनेक आहेत(6%).
 • सर्वेक्षणामध्ये, जे भारतीय हिंदू ते ईश्वरावर विश्वास ठेवतात असे म्हणाले, त्यांना विचारण्यात आले की त्यांना कोणता देव सर्वात जास्त जवळ असल्यासारखे वाटते तेव्हा प्रचंड बहुसंख्येने हिंदूंनी एकापेक्षा जास्त देव निवडले किंवा त्यांचे अनेक व्यक्तिगत देव असल्याचे सूचित केले (84%). हे फक्त जे हिंदू अनेक देवांवर विश्वास आहे असे म्हणतात (90%) किंवा ईश्वर एकच आहे आणि त्याचे अनेक अविष्कार आहेत (87%) त्यांच्याबाबतीतच नाही, तर जे लोक फक्त एक ईश्वर आहे असे मानतात (82%) त्यांच्याबाबतीत देखील सत्य आहे. सामान्यपणे हिंदूंना जो देव सर्वात जास्त जवळ असल्याचे वाटते, तो शिव (44%) आहे. त्या व्यतिरिक्त, सुमारे एक-तृतीयांश हिंदूंना हनुमान किंवा गणेश हे देव जवळचे असल्यासारखे वाटते (अनुक्रमे 35% आणि 32%).
 • अनेक भारतीय ज्या गोष्टी परंपरेने त्यांच्या धर्माशी जोडलेल्या नाहीत अशा समजुतींवर विश्वास ठेवतात : कर्मावर विश्वास ठेवण्यात भारतातील मुस्लिमांचे प्रमाण हिंदूंइतकेच (प्रत्येकी 77%) आहे, आणि 54% भारतीय ख्रिश्चनांचेही मतही तसेच आहे. जवळपास दहामधील तीन मुसलमान आणि ख्रिश्चन(अनुक्रमे 27% आणि 29%) हे त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे असे म्हणतात.
 • बहुतेक मुस्लीम आणि ख्रिश्चन म्हणतात की ते हिंदू, शीख, जैन आणि बौद्धांद्वारे पारंपारिकतेने साजरा केला जाणारा दिवाळी हा दिव्यांचा भारतीय उत्सव साजरा करण्यामध्ये सहभागी होत नाहीत. परंतु अल्पसंख्यांक ख्रिश्चन (31%) आणि मुस्लीम (20%) यांतील लक्षणीय संख्येने ते दिवाळी साजरी करतात असे सांगितले.

प्यु रिसर्च सेंटर द्वारे राष्ट्रीय स्तरावर 29,999 भारतीय प्रौढांमध्ये समोरासमोर आयोजित केलेल्या एका सर्वेक्षणामधील हे प्रमुख निष्कर्ष आहेत. स्थानिक मुलाखतकर्त्यांनी हे सर्वेक्षण 17 नोव्हेंबर 2019 ते 23 मार्च 2020 दरम्यान 17 भाषांमध्ये पूर्ण केले. सर्वेक्षणामध्ये भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश समाविष्ट केले गेले, ज्यामध्ये अपवाद फक्त मणिपूर आणि सिक्कीम होते, जेथे वेगाने विकसित होणाऱ्या कोविड-19 परिस्थितीमुळे 2020 च्या उन्हाळ्याच्या प्रारंभी फिल्डवर्क सुरू करण्यात अडचणी आल्या, तसेच दूरस्थ प्रदेश अंदमान व निकोबार बेटे आणि लक्षद्वीप; ज्या प्रदेशांमध्ये भारतीय लोकसंख्येच्या 1% च्या सुमारे एक चतुर्थांश लोकसंख्या आहे. जरी सुरक्षिततेच्या कारणांमुळे खुद्द काश्मीर प्रदेशात कोणतेही फिल्डवर्क झाले नाही, तरी जम्मु आणि काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश सर्वेक्षणामध्ये अंतर्भूत केला गेला.  29,999 प्रतिसादकर्त्यांच्या पूर्ण नमुन्यांच्या सँपलिंग चुकीतील फरक, अधिक किंवा वजा 1.7 टक्के एव्हढा आहे. सर्वेक्षण कसे करण्यात आले याविषयीची अधिक माहिती कार्यप्रणाली (मेथॉडॉलॉजी) मध्ये उपलब्ध आहे.

नवीन अहवालामधील उर्वरित माहिती सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा अधिक तपशीलवार शोध घेते. प्रकरण 1 मध्ये भारतीयांच्या धार्मिक स्वातंत्र्य आणि भेदभावाविषयीच्या मतांचे वर्णन केले आहे. प्रकरण 2 मध्ये भारतातील धार्मिक विविधता आणि अनेकत्ववाद यांचे परीक्षण केले आहे. प्रकरण 3 मध्ये धार्मिक विभाजन आणि आंतरधर्मीय विवाहाविषयी विचारांचा शोध घेतला गेला आहे. प्रकरण 4 मध्ये जातींविषयी भारतीय दृष्टीकोनाचा अहवाल दिलेला आहे. प्रकरण 5 मध्ये भारतातील धार्मिक ओळख विषयक घटकांचा अभ्यास केला आहे. प्रकरण 6 मध्ये भारतीय राष्ट्रवाद आणि राजकारणामध्ये धर्म बजावत असलेल्या भूमिकेचा अधिक बारकाईने तपास केला आहे. प्रकरण 7 मध्ये भारतातील धार्मिक प्रथांचे वर्णन केले आहे. प्रकरण 8 मध्ये धर्म मुलांपर्यंत कशा पकारे पुढे पोहोचवला जातो याचे विश्लेषण केले आहे. प्रकरण 9 मध्ये धार्मिक वस्त्रांविषयी सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर तपशीलवार माहिती दिलेली आहे. प्रकरण 10 मध्ये अन्न आणि धर्म याची बारकाईने तपासणी केलेली आहे. प्रकरण 11 मध्ये भारतातील धार्मिक श्रद्धांचा शोध घेतलेला आहे. आणि प्रकरण 12 मध्ये भारतीयांच्या ईश्वराविषयी श्रद्धांचे वर्णन केले आहे.

ह्या अभ्यासाला,दि प्यु चॅरीटेबल ट्रस्टस् आणि जॉन टेम्पलटन फाउंडेशन द्वारे निधी पुरवण्यात आला. हा अभ्यास प्यु रिसर्च सेंटर द्वारे जगभरातील धार्मिक बदल आणि समाजांवरील त्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी केलेल्या अधिक मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

प्यु रिसर्च सेंटर म्हणजे एक निष्पक्षीय वस्तुस्थितीचा संग्रह आहे जे जगाला आकार देणाऱ्या समस्या, दृष्टीकोन आणि वृत्तींविषयी माहिती सर्वसामान्य लोकांना देतात. ते धोरणात्मक स्थितीचा अवलंब करत नाहीत. सेंटर म्हणजे प्यु चॅरिटेबल ट्रस्टस् यांची एक उपशाखा आहे, जे त्यांचे प्रमुख निधी पुरवठादार आहेत.

 

पूर्ण अहवाल इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी, https://legacy.pewresearch.org/religion/2021/06/29/religion-in-india-tolerance-and-segregation येथे जा
अहवालाचे अवलोकन हिंदीमध्ये वाचण्यासाठी https://legacy.pewresearch.org/religion/wp-content/uploads/sites/7/2021/06/PF_06.29.21_India_overview_Hindi.pdf येथे जा

निष्कर्षाच्या या सारांशाचा त्याच्या मूळ इंग्रजी स्वरूपामधून मराठी मध्ये अनुवाद करण्यात आला आहे.